कोल्हापूर (प्रतिनिधी): गोकुळचे संचालक चेतन नरके यांना झी मिडियाच्या उडान-डेअर टू ड्रीम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अत्यंत कमी कालावधीत सहकार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई येथील पंचतारांकित हॉटेल मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चेतन नरके यांचे ३५ ए च्या निर्बंधामधून युथ बँक बाहेर येण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान, गोकुळ संचालक म्हणून जिल्ह्यातील दूध उत्पादन वाढीसाठी त्यांनी सुरु केलेले प्रयत्न, ग्रामीण भागातील सहकारातील संस्थांची वाढ आणि विकासाकरिताचा त्यांचा सहभाग आणि परदेशातील कॉर्पोरेट कंपन्यांमधील अनुभवाचा सहकार वाढीसाठी सुरु केलेला वापर याविषयावरील एक फिल्म यावेळी दाखवण्यात आली. यावेळी आयोजित परिसंवादात चेतन नरके यांनी भविष्यकाळात सहकार क्षेत्रातील संधी आणि अपेक्षित बदल यावर आपले विचार व्यक्त केले.
यावेळी ना.अशोक चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, अभिनेते अरुण नलावडे, अभिनेत्री श्रेया बुगडे, झी २४ तास चे संपादक निलेश खरे, कंट्री हेड मिनी हॅरीसन, झी मिडिया कोर्पोरेशन चे अधिकारी, पत्रकार, तसेच कृषी, सहकार, बँकिंग, उद्योग, बांधकाम, सामाजिक यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुढील आठवड्यात या संपूर्ण कार्यक्रमाचे झी २४ तास या वृत्त वाहिनीवरून प्रसारण होणार आहे.