अरुण नरके फौंडेशनने सामाजिक, शैक्षणिक, संशोधन, कला, सहकार इत्यादी क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटविला आहे.  थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद, सल्ले घेत नव सृजनात्मकतेला गती देऊन नव्याचा स्वीकार व जुन्याचा आदर बाळगत नवनवीन उपक्रम संस्था राबवित आहे. याच धर्तीवर मा. श्री. चेतन अरुण नरके यांच्या वाढ दिवसानिमित्त सप्टेंबर महिन्याच्या पहिला आठवडयामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये सर्वात मोठ्या ताकतीने डास प्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृती अभियान केले जाणार आहे. त्याची सुरवात ११ सप्टें पासून झाली.   यासाठी मा. श्री चेतन अरुण नरके यांनी लोकांना उदेशून आवाहन केला आहे ते खालील प्रमाणे

‘डास प्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृती अभियान ‘

नमस्कार,

आपल्या सर्वाना गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!

मला जाणीव आहे नेहमीच्या आनंद आणि उत्साहाला थोडी मुरड घालून कोरोनाची सर्व बंधने आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करत हा उत्सव आपल्याला साजरा करावा लागत आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर हे आपल्याला आवर्जून करावेच लागेल.

कोरोनासोबतच आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश गावे आणखी एका संकटाला सामोरी जात आहेत. ते म्हणजे डेंग्यू, मलेरिया आणि चिकन गुनिया. एवढ्याशा डासाचा डंख असह्य अशा केवळ शारीरिकच नाही तर किती मानसिक आणि आर्थिक वेदना देतो. हे ज्याला तो डंख बसला आहे ती व्यक्ती आणि त्याचे कुटुंबीयच सांगू शकतात. प्रसंगी डेंग्यू मुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यासाठी आपण आरोग्य यंत्रणा, स्वच्छता विभाग, शासन आणि प्रशासकिय यंत्रणेला संपूर्णपणे जबाबदार ठरवून पुढील उपाययोजनांसाठी वाट पहात बसतो. वास्तविक पहाता सार्वजनिक आरोग्य हे आपल्या वैयक्तिक आरोग्यावर अवलंबून असते कारण आपण प्रत्येकजण या समाजाचा घटक आहोत.

वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, सांडपाण्याची योग्य निर्गत, डासांची पैदास वाढेल अशा कोणत्याही गोष्टीला प्रतिबंध असे अत्यंत साधे आणि सोपे उपायचं खरतरं या आजारापासून बचाव करतात. प्रतिबंध हाच या आजारावरील खरा उपाय आहे. आणि म्हणूनच आरोग्य यंत्रणा, स्वच्छता विभाग, शासन, प्रशासन यांच्यासोबत आपण देखील यामध्ये आपले योगदान देऊ शकतो.

‘गाव करील ते राव काय करील’ या उक्ती प्रमाणे जर आपण सर्वांनी मनात आणले तर ते सहज शक्य आहे. आणि म्हणूनच डेंग्यू, मलेरिया आणि चिकन गुनिया. या आजारांपासून बचाव करण्यासाठी आम्ही एका उपक्रमाचे आयोजन करीत आहोत. गाव आणि प्रभाग पातळीवर आपण हा उपक्रम राबवू शकतो. एका दिवसाच्या एकात्मिक आणि सामुहिक प्रयत्नातून तसेच सोबत दिलेल्या उपाययोजना आणि सूचनांचे पालन केल्यास डेंग्यू, मलेरिया आणि चिकन गुनियाचे संकट रोखू शकतो.

कोल्हापूरच्या मातीतल्या पैलवानाला एका डासाने चीतपट करावे इतके आपण कमजोर नाही. म्हणूनच हे अभियान आपल्या सर्वाना यशस्वी करावयाचे आहे.

मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो की हा उपक्रम म्हणजे ११ सप्टेंबर रोजी असणाऱ्या माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला इव्हेंट नाही तर हे अभियान सार्वजनिक आरोग्यासाठी लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली लोकचळवळ व्हावी असा माझा मानस आहे. यासाठी मी स्वतः या उपक्रमात झोकून देऊन काम करत आहे.

डेंग्यू, मलेरिया आणि चिकन गुनिया या आजारांना रोखण्यासाठी आवश्यक अशा वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरुपात केलेल्या उपाययोजना याच मला माझ्या वाढदिवसानिमित्त मिळालेल्या शुभेच्छा असे मी मानतो.

माझी आपल्या सर्वाना कळकळीची विनंती आहे की या आजारांचे गांभीर्य ओळखून त्याला रोखण्यासाठी संकल्प पूर्वक हे अभियान राबवू आणि डेंग्यू, मलेरिया आणि चिकन गुनियाला हद्दपार करू.

डेंग्यू, मलेरिया आणि चिकन गुनियाला रोखण्यासाठी …

प्रतिबंध हाच उपाय …डासांना करूया गुडबाय …!

आपला

चेतन अरुण नरके

वाढदिवसा दिवशीच डास प्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृती अभियान पोस्टरचे ओपनिंग करण्यात आले.