मी माझ्या प्रत्येक मुलाखतीत, भाषणात, लेखात एकदातरी आवर्जून सांगतो की कोणतीही बाजारपेठ आता स्थानिक राहिली नाही तर आता प्रत्येक बाजारपेठ जागतिक बाजारपेठच आहे. हे अगदी सुरवातीलाच सांगण्याचे कारण म्हणजे भारतातीलचं नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात प्राचीन व्यवसायावर बोलत किंवा लिहित असताना या व्यवसायाला गाव, राज्य किंवा देशाच्या सीमांचे बंधन नाही  याचा विचार करून त्याच्या संधीचा प्रचंड आवाका लक्षात घ्यावा लागतो.

भारतातील लोकजीवन, लोकसंस्कृती आणि जीवनशैली प्रभावित करणारा, शेकडो वर्षांचा समृद्ध इतिहास आणि वारसा असणारा हा व्यवसाय स्वातंत्रोत्तर काळात प्रामुख्याने सहकाराच्या माध्यमातून संघटीत झाला, विकास पावला आणि स्थिरावला. मोठ्या शेतकऱ्यासह, अल्पभूधारक, शेतमजूर या सर्वांसाठी कृषी पूरक व्यवसाय म्हणून नगद स्वरुपात नेमाने उत्पन्न देणारा सर्वात विश्वासार्ह  व्यवसाय ठरला.  या सर्वात दूध उत्पादकाला केंद्रबिंदु मानून डेअरी उद्योग आणि पशुसंवर्धनाला पूरक असे सेवा आणि पशुखाद्य निर्मितीसारखे उद्योग निर्माण झाले आणि यशस्वी झाले. पिशवीतील दुधासोबत दही, ताक, तूप, लोणी, श्रीखंड अशा उपपदार्थ निर्मितीतून सहकारी दूध संघांनी आपापली बाजारपेठ निर्माण करत स्पर्धेला यशस्वी तोंड देत आपले  बाजारातील स्थान निश्चित केले. मागील काही वर्षात खासगी दूध संघांनी देखील चांगली कामगिरी करत बाजारपेठेत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

भारतात सुमारे ५० कोटी इतके पशुधन आहे. या पशुधनाच्या माध्यमातून भारतात वर्षाला सरासरी १९० मिलिअन मेट्रिक टन इतके दूध उत्पादन होते. जगाच्या तुलनेत त्याचे २२% एवढे प्रमाण आहे. दूध उत्पादनात भारताचा जगात  प्रथम क्रमांक आहे. वरवर या सर्व गोष्टी सकारात्मक दिसत असल्या तरी नैसर्गिक संकटे, जागतिक स्पर्धा, धोरणे, व्यावसायिक दृष्टिकोन आणि  भविष्यकालीन नियोजनाविषयी  अभाव,  सहकारातील भ्रष्टाचार, या सर्वामुळे अमर्याद संधी असणाऱ्या या व्यवसायासमोर नवनवीन आव्हाने देखील निर्माण झाली आहेत. 

जगभरातील नामवंत कंपन्या आपले दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घेऊन आपल्या बाजारपेठेत प्रवेश करत आहेत. निर्माण झालेल्या जागतिक स्पर्धेला यशस्वीपणे तोंड द्यायचे असेल आणि आपली हक्काची बाजारपेठ कायम ठेवून जगाच्या बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करायचे असेल तर दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी नियोजन आणि कालबद्ध कृती कार्यक्रम राबविण्याची गरज आहे.

दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रति पशु दूध उत्पादनात वाढ करणे आणि पशुधनात वाढ करणे हे दोन पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. चांगल्या प्रतीचे आणि भरपूर दूध उत्पादन घ्यायचे असेल तर चांगल्या जातिवंत जनावरांची पैदास करणे गरजेचे आहे. याकरिता दूध उत्पादकांना चांगल्या जनावरांची उपलब्धता करून देणे तसेच घरच्या घरी जातिवंत जनावरांची पैदास करण्यासाठी आणि त्यांच्या संगोपनासाठी दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.

यामध्ये प्रामुख्याने चांगल्या आणि जातिवंत जनावरांचे सीमेन उपलब्ध करून देण्यासाठी विभागवार आधुनिक फ्रोझन सीमेन सेंटर निर्माण करावी लागतील. पारंपारिक कृत्रिम रेतन पद्धतीमध्ये अनेक दोष आहेत. या प्रकारात गर्भधारणेचे प्रमाण कमी आहे. वारंवार कृत्रिम रेतन करावे लागते. असेच मानवी चुका झाल्या तर गर्भाशयात  संसर्ग निर्माण होण्याच्या आणि इजा होण्याचा संभव असतो.  दोष दूर करून आधुनिक पद्धतीचा वापर करून जर कृत्रिम रेतन सुरु केले तर निरोगी पशुधन वाढण्यास मदत होईल. माज वेळेत ओळखता आला तर अधिक अधिक वेताचा लाभ शेतकऱ्याला घेता येईल. यामधून पशुधनात वाढ होण्यासोबत शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढेल. याविषयी या यंत्रणेतील लोकांना प्रशिक्षित करणे  आणि  दूध उत्पादकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे.

यासोबत महत्वाचा भाग आहे तो जनावरांच्या आहार व्यवस्थापनाचा. मानवापासून इतर सर्व सजीवांसाठी हि बाब जर आपण गांभीर्याने घेतो तर मग दुभत्या जनावरांसाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. ऊसाच्या पट्ट्यातील  शेतकरी जनावरांच्या आहारात मुख्यत्वे ऊसाच्या वाड्याचा वापर करतात. वाड्यातील ऑक्झीलिक अॅसिड मुळे त्याच्या अतिसेवनाने जनावराच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. यामध्ये माज वेळेत न येणे, गर्भाशयाचे आजार याचा प्रामुख्याने समावेश होतो. म्हणूनच आहार व्यवस्थापन हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. संतुलित हिरव्या आणि कोरड्या चाऱ्या सोबत, योग्य प्रमाणात पिण्याचे शुद्ध पाणी देणे आवश्यक आहे. उत्तम प्रतीच्या दुधासोबत जनावराच्या शरीराचे योग्य पोषण होण्यासाठी चांगल्या प्रतीचे  पशुखाद्य  गरजेचे असते. पशुखाद्य उत्तम असेल तर दुधामुळे शरीराची झालेली झीज भरून काढण्यासोबत त्याला आवश्यक सर्व घटकांचा पुरवठा शरीराला होतो. दुधाची प्रत सुधारते आणि चांगल्या फॅट च्या दूधाचे उत्पादन घेता येते. जनावर निरोगी ठेवण्यासाठी दररोज पशुखाद्या सोबत मिनरल मिक्श्चर देणे आवश्यक आहे. दुभत्या जनावरांच्या आहाराविषयी अधिक जागरूकतेने काम करण्याची गरज आहे. चलता है हि सवय चालणार नाही.

सध्याच्या प्रचलित पद्धतीत संकलनाच्या विविध टप्प्यात मानवी हाताचा स्पर्श होत असतो. जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करायची असेल तर  सर्वात महत्वाचा निकष असणाऱ्या स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण दूध संकलनात हा सर्वात मोठा अडसर ठरत आहे. प्रत्येक गावात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संस्था पातळीवर एकाच ठिकाणी  धार काढून गाय आणि म्हैशीचे स्वातंत्र्यरित्या दूध संकलन करता येईल अशा पद्धतीची यंत्रणा उभी केली तर किटली, कॅन, आणि इतर हाताळणी यामधील मानवी स्पर्श विरहीत स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण दूध ग्राहकांना देता येईल. यासाठी याकडे अधिक गांभीर्याने विचार करून दूध उत्पादकांना नवं आणि सोपं तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज आहे. याशिवाय याच् पद्धतीने  देशी गाय आणि ए-२ या दोन्ही प्रकारचे दूध स्वतंत्ररीत्या संकलित केले तर या दुधालादेखील जगभर मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. तसेच या दूधाला मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर होणे शक्य होईल.

दूध उत्पादक शेतकऱ्याला चांगला भाव द्यायचा असेल तर पिशवीतील दुधासोबत उपपदार्थांची बाजारपेठ निर्माण करावी लागेल. उपपदार्थ निर्मिती मध्ये वाढ करणे तसेच बाजारपेठेत ज्या पदार्थांना मागणी आहे असे पदार्थ निर्माण करणे यासाठी सर्व दूध संघांनी उपपदार्थ निर्मितीमधील आपला वाटा वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आधुनिक यंत्रसामुग्री, कुशल मनुष्यबळ जे जे आवश्यक आहे त्या सर्व बाबींचा वापर करावा लागेल. एखाद्या विशिष्ट पदार्थावर संशोधन आणि विकास करून त्याची स्वतंत्र बाजारपेठ निर्माण करणे शक्य आहे. म्हैस दुधाचा भारत हा सर्वात मोठा निर्माता असल्यामुळे म्हैस दूध आणि या दूधापासून निर्मित पदार्थांची निर्यात आपण मोठ्या प्रमाणावर करू शकतो. चीज बटर यासारख्या जगभर बाजारपेठ असणाऱ्या उत्पादनाची निर्मिती वाढवण्यासाठी येणाऱ्या काळात लक्ष द्यावे लागेल. यासोबत वैद्यकीय क्षेत्र आणि पूरक खाद्यातील पदार्थ निर्मिती आणि त्याचा वापर आणि विक्री वाढवण्यासाठी या क्षेत्रातील सर्व घटकांनी संघटीतरित्या  जनजागृती करण्याची गरज आहे.

यासाठी सहकारी आणि खासगी अशा दोन्ही संस्थांनी  स्वतःला सक्षम बनवणे हि काळाची गरज आहे. राज्यात सर्व जिल्ह्यात दुधाला एकच आणि आधारभूत किंमत मिळणे आणि त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे. पशुधन खरेदी पासून आवश्यक त्या सर्व सेवा आणि आवश्यकतेप्रमाणे अनुदान आणि इतर मदत दूध उत्पादकांना मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने प्रोत्साहन देण्याची आणि पुढाकार घेण्याची गरज आहे. हा उद्योग अजून विकसित झाला तर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासोबत अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागणार आहे. संघटीत आणि नियोजनबद्ध दुग्ध व्यवसाय करून दूध उत्पादकांना बळ देणारा गोकुळ दूध संघ असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत नाहीत हे त्याचे प्रमाण आहे.

डेअरी हा आता फक्त कृषी पूरक उद्योग राहिला नाही. त्त्या व्यवसायाचे एक स्वतंत्र स्थान आहे. जी.डी.पी. मधील त्याच्या योगदानातून या क्षेत्राने ते सिद्ध केले आहे.  जगाच्या पाठीवर डेअरी उद्योगात आपल्या देशाइतकी संधी असणारा क्वचितच दुसरा देश मिळेल. पण पारंपारिक उंबरठ्यावर उभे राहून आपण जागतिक स्पर्धेला सामोरे जाऊ शकत नाही यासाठी स्वतःमध्ये आवश्यकते बदल करणे आवश्यक आहे. यामध्ये अगदी मुलभूत पातळीपासून म्हणजे  अधिक दूध उत्पादनासोबत गुणवत्तापूर्ण दूध निर्मिती, मानवी स्पर्श विरहीत संकलन, ०% भेसळ, दुग्धजन्य आणि मूल्यवर्धित उत्पादनांची विशाल श्रेणी, नवनवीन उत्पादनासाठी संशोधन आणि विकास, आदर्श साठवणूक, प्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, निर्दोष आणि निर्धोक वाहतूक आणि  वितरण व्यवस्था अशा अनेक बाबींचा समावेश आहे. कोणत्याही जागतिक स्पर्धेला तोंड देणारी सक्षम यंत्रणा मग ती स्पर्धा किमतीशी असेल नाहीतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या चव आणि दर्जाशी. ज्यादिवशी आपण आत्मविश्वासाने जागतिक बाजारपेठेला सामोरे जाऊ  त्या दिवसापासून  जगाचे गोकुळ म्हणून भारताची ओळख निर्माण होईल.

चेतन अरुण नरके

( संचालक, गोकुळ दूध संघ, अर्थ तज्ञ, थायलंड सरकारच्या वित्त मंत्रालयाचे सल्लागार, डेअरी उद्योगाचे अभ्यासक )