मुंबई : डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन, थायलंड, आणि मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स रॉयल थाय गव्हर्नमेंट यांच्या वतीने आणि महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर च्या सहकार्याने हडपसर पुणे येथील लक्ष्मी लॉन येथे २५ ते २७ मार्च २०२२ असे तीन दिवस टॉप थाय बॅण्ड ट्रेड फेअर २०२२ चे आयोजन करण्यात येणार आहे. हेल्थ अॅण्ड ब्युटी, फूड अॅण्ड बेवरेज, फर्निचर आणि फॅशन या चार श्रेणीतील थायलंड मधील ३४ उद्योजक,उत्पादक , संस्था या मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती थायलंडच्या वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार चेतन अरुण नरके यांनी दिली आहेत. या पत्रकार परिषदेत थायलंडच्या कॉन्स्लेट जनरल सुपात्रा आणि महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते.
दोन्ही देशांमधील उद्योजकांना संधी मिळणार :
याबाबत चेतन नरके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, दाेन्ही देशातील व्यापारी संबंध वृद्धिंगत करणे, दोन्ही देशातील उद्योजकांमध्ये व्यापारी करार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये दोन्ही देशामधील उद्योजकाना उद्योग संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. यातून आर्थिक, बौद्धिक गुंतवणुकीसह रोजगार आणि उद्योगाच्या नवनवीन संधी निर्माण होणार आहेत. १९४७ मध्ये भारतासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारा थायलंड हा पहिला आशियाई देश होता. या दोन देशामधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दोन हजार वर्षांहून अधिक जुने आहत धार्मिक आणि सांस्कृतिक समानतेमुळे मैत्रीचा पाया घट्ट होत सर्वच पातळीवरील संबंध खोलवर रुजले गेले आहेत.
———————————————————-
व्यापार विषयक संबंध वृद्धिंगत होतील-
चीन आणि अमेरिकेचे बिघडलेले व्यापारी संबंध आणि जागतिक पातळीवरील राजकीय घडामोडीचा फायदा थायलंड आणि भारताच्या एकत्रित आर्थिक विकासासाठी संधी निर्माण करणारा आहे. या सर्वाचा विचार करता या ट्रेड फेअर च्या माध्यमातून दोन्ही देशातील स्थानिक उद्योगांना आंतरराष्ट्रीय पातळीवर समान व्यासपीठ निर्माण होणार आहे. याकरिता लक्ष्मी लॉन येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहेत. या आयोजनासाठी लागणार सर्व खर्च डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन, थायलंडच्या वतीने करण्यात येणार आहे. आणि यामध्ये सहभागी होण्यासाठी आणि प्रवेशासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्यामध्ये प्रस्थापित व्यापार विषयक संबंध वृद्धिंगत होतील असा विश्वास चेतन अरुण नरके यांनी व्यक्त केला आहे.
————————————————
कोरोनातही द्विपक्षीय व्यापार वाढ-
जागतिक आरोग्य सुरक्षा निर्देशांकात यायलंड जगात सहावा आणि आशियात पहिला क्रमांक आहे. थायलंडच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात २१ टक्के वाटा हा पर्यटन क्षेत्राचा आहे. असे असले तरी थायलंड इतर अनेक उद्योगात अग्रेसर आहे. यामध्ये प्रामुख्याने शेती, कृषी प्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रिक उपकरणे, कॉम्प्युटरचे सुटे भाग, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा निर्मिती, वाहने, वाहतूक व्यवसाय, चित्रपट आणि करमणूक, कलात्मक वस्तू असे अनेक उद्योग थायलंडच्या राष्ट्रीय उत्पन्नात भर घालतात. भारत आणि थायलंड दरम्यान सध्यस्थितीत १२५ बिलियन डॉलर चा व्यवसाय होत आहे. भविष्यात या मध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. कोरोना महामारीत आणि आर्थिक मंदीतही थायलंड आणि भारत या वर्षाच्या पहिल्या १० महिन्यात ५६ टक्के द्विपक्षीय व्यापार वाढ झाली आहे ही खूपच सकारात्मक बाब असल्याची माहिती थायलंडच्या कॉन्स्लेट जनरल सुपात्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली
.